संवादलहरी लेख क्र. ४७
“तळमळे(ळी) चित्त दर्शनाची आशा। बहु जगदीशा करुणा केली॥

Advertisements

संवादलहरी लेख क्र. ४७
“तळमळे(ळी) चित्त दर्शनाची आशा। बहु जगदीशा करुणा केली॥

“तळमळे(ळी) चित्त दर्शनाची आशा। बहु जगदीशा करुणा केली॥” १४८६
तुकाराम महाराजांच्या एका अप्रतिम अभंगातील हे पहिले चरण आठवण्याचे कारण असे झाले की श्रीकृपेने लिहिला गेलेला ‘Quality or quantity?’ हा लेख लिहून झाल्यावर सातासमुद्रापलीकडून एका गुरुभगिनींचा फोन आला होता. त्यांची अशी शंका होती की त्यांनी सोडलेला ‘साडेतीन कोटींचा’ संकल्प जर या जन्मात पूर्ण झाला नाही तर…..!

बघा, त्या ताईंना संकल्प पूर्ण होण्याची किती तळमळ लागली आहे, त्यांनी स्वतःच्या आयुष्याचा किती विचार केला आहे?
“आपुलिया हिता जो होय जागता। धन्य मातापिता तयाचिया॥
कुळीं कन्यापुत्र होती जीं सात्विक। तयाचा हरिख वाटे देवा॥
गीता भागवत करिती श्रवण। अखंड चिंतन विठोबाचें॥
तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा। तरी माझ्या दैवा पार नाहीं॥” ९
असो!
नाहीतर आपण; होतंय, चाललंय. श्रींनी अनुग्रह दिलाय ना, तेच बघतील.

मुळात जपाचा संकल्प अशासाठी करायचा असतो की जास्तीतजास्त जप व्हावा ही तळमळ वाढून रोजच्या जपात वाढ व्हावी.
समजा या जन्मात केलेला जपाचा संकल्प पूर्ण झाला नाही तर पुढील जन्मी तो carry forward होईल. म्हणजे समजा या जन्मी इयत्ता पाचवीपर्यंत अभ्यास झाला असेल तर पुढील जन्मी डायरेक्ट सहावीच्या वर्गात प्रवेश मिळून त्याप्रमाणे अभ्यास चालू होईल. आपण बघतोच की काही मुले अगदी लहान वयातच नामात रंगून जातात, किंवा त्यांचे ज्ञानेश्वरी, गीता, हरिपाठ, वगैरेवर प्रभुत्व असते. वस्तुतः एकदा का आपण आपला हात श्रींच्या हाती दिला की ते आपला हात रामाच्या हाती थोपवणारच हे नक्की; अशी खात्री असावी, अशी श्रद्धा असावी, अशी निष्ठा असावी.

श्रींचे थोर शिष्य डॉ. कुर्तकोटी यांच्या मनात एक प्रश्न वारंवार येई. तो असा की, “आपण श्रीमहाराजांना गुरु मानलें हे खरें पण या जन्मीं आपल्याला मुक्ति मिळाली नाही तर पुढच्या जन्मीं श्रीमहाराजांचे सहाय्य आपणास मिळेल कां नाही?”
त्यांच्या अंतरीची शंका जाणून श्री स्वतःहूनच म्हणाले, “श्रीगुरु म्हणजे साकार झालेला आनंद. त्याचा देह केवळ निमित्तमात्र असतो. शिष्य अनुग्रह घेतो तेव्हां त्या देहातील परमानंदाशीं संबंध जोडतो. हा संबंध अर्थात मानसिक असतो. शिष्याच्या अंतःकरणांत जी गुरूची प्रतिमा असते तिच्याशी तो संबंध असतो. म्हणून बाहेरून गुरूशीं वियोग झाला किंवा गुरूनें देह ठेवला तरी या घटनांचा परिणाम शिष्याच्या अंतःकरणातील गुरुमूर्तीवर होत नाही. शिष्य कांहीं पूर्ण वासनाविमुक्त नसतो. त्याच्या वासनेप्रमाणे त्याला पुनः जन्म घ्यावे लागतात. परंतु त्याच्या सूक्ष्मदेहांत स्थिरावलेले त्याचे गुरु प्रतेक जन्मात भावरूपानें त्याच्याबरोबर अवतरतात. त्या गुरुमूर्तीच्या आधारानें शिष्य आपली नामसाधना चालूं ठेवतो. पदोपदीं गुरूच्या अस्तित्वाची आणि सहाय्याची प्रचीति त्याला येत राहातें. अखेर ग्रंथिभेद होतो, देहबुद्धि मरते आणि मनाचे उन्मन होतें. मग गुरुमूर्ति विलीन होते. वास्तविक गुरु तर मुक्तच असतो. पण अनेक शिष्यांच्या अंतःकरणात आरूढ होऊन प्रत्येकाला भगवंतापर्यंत पोचवण्याचें सामर्थ्य ज्याच्यांत असते त्यालाच गुरुपद खरे शोभून दिसतें. म्हणून एखाद्या शिष्याने एकदा का गुरुला मनानें घट्ट धरलें की मग तो मुक्त होईपर्यंत गुरु त्याच्या बरोबर चालतो.”
असो!

असच एका १९ वर्षाच्या तरुणाला सद्गुरू भेटीची तळमळ लागली व त्याने मला त्याविषयी विचारले.
श्री म्हणतात, “ज्याला सद्गुरूभेटीची तळमळ लागली त्याला गुरु भेटणे अशक्य नाही; निदान हिंदुस्तानात तरी!”
काहीजणांना अशी शंका होती की, “सद्गुरू भेटल्यावरच नाम घ्यावं का? आधी घेतलं तर त्याचा फायदा होईल का?”
मुळात सद्गुरूंची भेट होण्यासाठीच नाम घेणं आवश्यक आहे.
श्री म्हणतात, “पेरू पिकला की पोपट येऊन चोच मारतो.”
म्हणजे आपण आधी साधन करून थोडंतरी तयार व्हायला हवं. त्या साधनानेच साधनाचे व श्रींचे प्रेम निर्माण होईल व त्यांच्या भेटीची तळमळ वाढेल. तळमळीने परिसीमा गाठली की ते नक्कीच अनुग्रहप्राप्तिसाठी त्यांच्या स्थानी बोलावतील; हेच कशाला पूर्वपुण्याई असेल, संपूर्ण शरणागत भाव असेल, तर प्रत्यक्ष समोर हजर होतील आणि अनुग्रह देतील.

अहो, श्रींचा अनुग्रह मिळणं म्हणजे का साधी गोष्ट आहे! जन्मोजन्मीची पुण्याईच असते म्हणून श्रींसारखे सद्गुरू भेटतात. त्यांनी दिलेल्या अनुग्रहात प्रचंड सामर्थ्य असते. त्यांच्या उपासनेची सर्व शक्ती त्यांनी दिलेल्या नामात ओतप्रत भरलेली असते. साधकाच्या जीवनाचा कायापालट करण्याची ताकत त्यांनी आपलंसं करण्यात असतें. त्यांचा अंगीकार म्हणजे स्वस्वरुपाची ओळख करून घेणे, जीवाचा शिव होणे, मनुष्यत्वातून देवत्वात परिवर्तन होणे, जिवंतपणीच आत्मानंद भोगणे व जुन्या वस्त्राचा त्याग करावा तसं अंतसमयी या नश्वर शरीराचा त्याग अगदी सहजपणे करणे.
असो!
सहज आठवलं म्हणून श्रींच्या अनुग्रहाच्या सामर्थ्याविषयी एक गमतीदार गोष्ट सांगतो.
एक प्रेमळ भक्त श्रींकडे वारंवार जात; पण एकटेच. एकदा श्रींनी त्यांना पत्नीला न आणण्याचे कारण विचारता ते म्हणाले, “महाराज, माझ्या बायकोला हात-उचलेपणाची वाईट खोड आहे. त्यास चोरी म्हणता येत नाही, कारण दुसऱ्याची वस्तू आपण घेतली आहे ही जाणीव तिला नसते. ती वस्तू अंगावर घालून किंवा हातात घेऊन त्या वस्तूच्या मालकापूढे माझी बायको निःसंकोचपणे मिरवते. पण तिच्या या दोषामुळे लोकांना उपसर्ग होतोच, शिवाय तिचे हसे होते, व मलाही ओशाळवाणे वाटते. म्हणून मी तिला कुठे नेण्याचे टाळतो.”
हे ऐकुन श्री म्हणाले, असू दे. ती काही चोरी करायची म्हणून करीत नाही ना! तर मग राम सांभाळील. पुढच्या खेपेस तिला घेऊन या.”
श्रींच्या सांगण्याप्रमाणे पुढच्या खेपेस ते भक्त पत्नीसह गोंदवल्यास गेले. बाई श्रींच्या पाया पडल्या तेंव्हा तिच्या कानात ते हळूच बोलले, “इथे राम आपल्याला सतत पाहतो बरं का!”
हाच त्या बाईवर अनुग्रह झाला. तो शक्तिपातच होता. गोंदवल्यास जवळजवळ महिनाभर दोघे राहिले, पण बाईकडून एकदाही उचलेपणाचा प्रकार घडला नाही व ती सवय कायमची सुटली. * असो!
“इथे राम आपल्याला सतत पाहतो बरं का!” या श्रींच्या वचनात रामरायाच्या अस्तित्वाची जाण आहे, खूण आहे.
आपल्यालाही अशीच श्रींच्या अस्तित्वाची जाणीव अखंड असणे हा परमार्थ. जरूर आहे ती ‘ते सतत आपल्या बरोबर आहेतच’ या निष्ठेची.
१३/०९/२०२० या तारखेच्या ‘कानडीनें केला मऱ्हाटा भ्रतार’ या लेखात आई आजारी असल्याने आईसाठी येणाऱ्या २८/३० वर्षाच्या ज्या मुलीचा उल्लेख केला होता, तिला ४ तारखेला नाम घ्यायला लागल्यापासून ९ तारखेपर्यंत श्रींच्या अस्तित्वाचे तीन अनुभव आल्याचे आपण पाहिलेच. नंतर १५ तारखेला जेंव्हा ती रात्री आली तेंव्हा तिला आईचं आटपायला ९ वाजले होते व निघणार येवढ्यात लाईट गेल्याने ती थांबली. (म्हणून हल्ली तिला खूपच लवकर घरी पाठवतो) त्याचवेळी मी स्वामीनीला श्रींच्या अस्तित्वाचा एक अनुभव वाचून दाखवत होतो, तिनेही तो ऐकला. ती ऐकत होती म्हणून माझ्या जीवनातील श्रींचे २/३ अनुभव तिला सांगितले. नंतर उशीर होईल म्हणून मीच तिला निघण्याविषयी म्हणालो व घरापासून ३/४ मिनिटांवर असलेला मेनरोड येईपर्यंत लॉकडाऊनमुळे असलेली सामसूम व त्यात लाईट गेलेले म्हणून तिला निघताना म्हणालो, “घाबरु नकोस, महाराज तुझ्या बरोबर आहेतच. मी त्यांना सांगितलं आहे. घरी पोहचलीस की फोन कर.” त्याप्रमाणे ती निघाली.
दुसऱ्या दिवशी ती सकाळी आल्याआल्या अत्यंत अधीर होऊन मला म्हणाली, “दादा, मला तुम्हाला एक गंमत सांगायची आहे.” ती म्हणाली, “काल लाईट गेल्यावर मी इथून गेले तेंव्हा सर्वत्र अंधार होता, पण कोणीतरी माझ्या थोडं मागे माझ्या मागून येत आहे असं मला वाटत होतं, त्याची सावली माझ्या पुढे पडलेली दिसत होती. मी घाबरले. कस्तुरी प्लाझाजवळ (एक ठिकाण) आल्यावर लाईट आले आणि मी पटकन मागे वळून बघितलं, तर मागे कोणीच दिसेना.”
अर्थात लाईट येईपर्यंत श्रीच तिच्या मागे तिचं रक्षण करत होते.
“जेथें जातों तेथें तू माझा सांगाती। चालविसी हातीं धरूनियां॥” १३०७
असो!

तर वरील सर्व घटनांत महत्त्वाचा मुद्दा असा की तळमळ हवी; त्याशिवाय परमार्थ नाही.
कसं आहे की, आपल्याला पैसा, चांगली नोकरी, मुलीचं चांगल्या घरी लग्न, स्वतःच घर, तत्सम नश्वर गोष्टी मिळवण्याची तळमळ असते. पण भगवंत हवाच असं नाही. त्याची प्राप्ती करून काय मिळणार आहे? हा! त्याने दिलेल्या लौकिक वस्तूत आम्हाला रस आहे. त्यावाचून आमचं अडत आहे. त्याशिवाय इतर कुठे आनंद आहे, ह्याची आम्हाला कल्पनाच नाही. अशाश्वताच्या परे वसणाऱ्या शाश्वत आनंदाची चुणूकच कधी अनुभवाला आलेली नसल्याने आपली अवस्था समुद्राची कल्पना नसलेल्या व गढूळ डबक्यालाच सर्वस्व मानणाऱ्या बेडकासारखी झालेली आहे. क्षणभंगुर वैषयीक आनंदात रमण्यात आपण स्वतःला धन्य समजून राहिलो आहोत. आत्मानंद म्हणजे काय असतो याची पुसटशी कल्पनादेखील आपल्याला येऊ शकत नाही.
श्री एकनाथ महाराजांनी आत्मानंदाला मैथुनानंदाचे प्रमाण लावले आहे. त्यावरून श्री म्हणाले, “सामान्य माणूस वेगवेगळ्या मार्गाने आनंदाचा अनुभव घेतो. त्यापैकी सर्वात उत्कट अनुभव मैथुनात येतो. त्याच्या कितीतरी पट ब्रह्मानंद आहे हे सांगण्यासाठी नाथांना ती उपमा द्यावी लागली. उत्कट आनंदाचे याच्यापेक्षा जास्त माप तुमच्यापाशीं नाहीं; याबद्दल नाथांना दोष कसा बरे देता येईल?” *
म्हणून जीवनाला येऊन या आत्मानंदाचा शोध घ्यावा. तो शोधायला का कुठे बाहेर जायचं आहे? तो आपल्यातच आहे; आपल्या अंतरातच वसलेल्या आनंदस्वरूप श्रींच्या अखंड स्मरणात आहे, पवित्र श्रीचरणी आहे, त्यांच्या अविरत अनुसंधानात आहे, त्यांच्या अलौकिक लीलांच्या चिंतनात आहे. त्यांचं एवढं स्मरण करावं, पदोपदी आठवण ठेवावी की मनाला इतर काही व्यापारच रहाणार नाही. संपूर्ण मन त्यांच्या मधुर स्मृतींनी व्यापून टाकावं आणि संपूर्ण जगाचा, नश्वर देहाचा विसर पडल्याने त्यासंबंधीच्या कटू स्मृती, दुःख यांचे विस्मरण होऊन, अवर्णनीय आनंदाचा अनुभव घ्यावा.
असो!
तर आपला मुख्य मुद्दा हा की ईश्वर प्राप्तीची तळमळ लागायला हवी; रामकृष्णंसारखी, समर्थांसारखी, ब्रह्मानंद महाराजांसारखी.

आनंदमयी जगज्जननीच्या पुजेअर्चेच्या वेळी सर्व जगाचा विसर पडून रामकृष्ण परमहंस तन्मय होत असत. भावविव्हल होऊन ते जगन्मातेला आपल्या हृदयातील व्याकुळता निवेदन करीत. अतिशय भक्तिपूर्ण अंतःकरणाने भजने गात असता त्यांच्या डोळ्यातून सतत प्रेमाश्रू वाहू लागत. आईच्या ओढीने, तिच्या प्राप्तीच्या तळमळीने, त्यांचे व्याकुळ मन अव्यक्त अशांतीने व्यापून जाई व त्याच भावावस्थेत ते आई! आई! अशी करूण हाक मारून आपला देह धाडदिशी धरणीवर लोटून देत व गडाबडा लोळू लागत. याच व्याकुळतेची परिणीती म्हणून त्यांच्या अंतराच्या आतील गाभ्यातून शब्द निघत, “आई, हा आणखी एक दिवस गेला पहा, अजुन तुझे दर्शन घडले नाही!” **
हृदयीची हीच आर्तता व्यक्त होताना श्रींचे थोर शिष्य रामानंद महाराज यांच्या मुखातून शब्दसुमने प्रकटतात;
“या दीन किंकराला। कधिं भेटसी दयाळा॥ ध्रु०॥
किती आठवूं तुला रे। विनवूं किती तुला रे॥
बहु कंठशोष झाला। कधी भेटसी दयाळा॥
आवरील कोण विषया। कैसी तुटेल माया॥
चित्तांत क्षोभ झाला। कधी भेटसी दयाळा॥”
असो!
रामरायाच्या भेटीची अत्यंत तळमळ लागलेल्या समर्थांनी लग्नाच्या आधीच पळ काढून देवाच्या ध्यासात बारा वर्षे घालवली व संपूर्ण शरणागतीने रामाच्या पायावर डोके ठेवून सांगितले, “रामा, मी हा देह तुला अर्पण केला आहे. आता याची मला गरज नाही. तुझ्यावाचून जगणे मला अशक्य आहे.” जगात रामरायाखेरीज त्यांना कोणीही आप्त राहिला नाही.
“दासाची संपत्ति रामसीतापति। जीवाचा सांगाती राम एक॥
राम एक माता राम एक पिता। राम एक भ्राता सहोदर॥
सहोदर विद्या वैभव कांचन। सर्वही स्वजन राम एक॥
राम एक स्वामी राम हा कैवारी। लाभ या संसारीं राम एक॥
राम एक ज्ञान राम एक ध्यान। राम समाधान रामदासीं॥”
तुकाराम महाराजांच्या मनाची अवस्थादेखील समर्थांसारखीच झाली होती. विठ्ठलाशिवाय त्यांना दुसरं कोणतं नातंच उरलं नाही; देहाचं भान उरलं नाही, देहाची किंमत उरली नाही. देह पांडुरंगाच्या चरणी अर्पण करताना त्याच्या विषयीच्या असीम प्रेमापोटी त्यांची वाचा अनावर होऊन अंतरीतून भावना प्रसवतात;
“विठ्ठल आमुचा निजांचा। सज्जन सोयरा जीवाचा॥
मायबाप चुलता बंधू। अवघा तुजशीं संबंधु॥
उभयकुळीं साक्ष। तूंचि माझा मातुळपक्ष॥
समर्पिली काया। तुका म्हणे पंढरीराया॥” १५४८
असो!
श्रींचे कल्याण शिष्य (कल्याण स्वामींसारखे थोर) ब्रह्मानंद महाराजांना लागलेल्या सद्गुरूभेटीच्या तळमळीनेच तर “गुरूराव माझे ब्रह्मचि साकार। केला उपकार धरुनी देह॥” अशी कृतज्ञता व्यक्त होऊन “अनिर्वाच्य ब्रह्म चैतन्यासि आलें। दुष्टहि तरले दर्शनयोगें॥” अशी श्रींच्या असीम करुणेची साक्ष त्यांना पटली व केवळ संपूर्ण शरणागती पत्करल्याने श्रींनी त्यांना अगदी आपल्यासारखं केलं; अखंड ब्रह्मानंद भोगणारं पूर्णब्रह्म.
असो!

श्री म्हणतात, “परमेश्वर अत्यंत अल्पसंतुष्ट आहे. आपण त्याच्याजवळ एक पाऊल पुढे गेलो तर तो दोन पावले आपल्याजवळ येईल. परंतु आपल्याला त्याच्याजवळ जायची तळमळच लागत नाही. आपले विकार, आपला अहंपणा, आपली देहबुद्धी आपल्याला मागे खेचते. या सर्वांचे बंध तोडून जो परमेश्वराकडे जातो तो पुन्हा मागे फिरत नाही. परमेश्वराची प्राप्ती ही वयावर, श्रीमंतीवर, जातिधर्मावर अवलंबून नाही; ती एका तळमळीवर अवलंबून असते.”

मतितार्थ असा की श्रींची प्राप्ती व्हावी अशी खरी इच्छा असेल तर “जीवनावांचूनी तळमळी मासा। प्रकार हा तैसा होतो जीवा॥” असे मनाचे अवस्थांतर होणे ही अविभाज्य अट आहे.
आता ही तळमळ लागणार कशी?…..
सोपं आहे!
त्यांच्याविषयी प्रेम निर्माण झालं की त्यांच्या भेटीची तळमळ लागेल.
असं बघा, समजा तुमचा कोणाशी साखरपुडा झाला, की तुमच्या प्रेमपात्राच्या भेटीची तुम्हाला तळमळ लागते. एकदोन दिवस भेट झाली नाही तर जीव कासावीस होतो. तो/ती कधी भेटेल असं वाटून जीवाला चैन पडत नाही. मन आतुर होतं. कधी एकदा तो/ती भेटते आणि मनीचे गुज प्रकट करतोय असं होऊन जातं. कधी रुसवा-फुगवा होऊन अबोला धरला गेला तर कधी फोन येतोय, कधी संदेश येतोय याचीच आतुरता; अगदी बेचैन होऊन जातं. एकएक क्षण एकएक दिवसासारखा वाटायला लागतो. खाण्यापिण्यात लक्ष लागत नाही, काही करावसं वाटत नाही.
असो!
आता तुम्ही म्हणाल, “हे सर्व मला कसं माहीत?”
अहो, माझाही साखरपुडा, लग्न झालं आहे की!

साखरपुड्यावरुन सहज आठवलं म्हणून एक गंमत सांगतो.
आमचा साखरपुडा झाला तेंव्हा आमच्याघरी नुकताच लॅडलाईन फोन आला होता, परंतु स्वामिनीच्या घरी फोन नसल्याने ऑफिस सुटले की ती तिच्या घराच्या जवळच राहणाऱ्या तिच्या मामाच्या घरी ऑफिसमधून परस्पर जात असे व मी तिथे फोन करत असे. मामाच्या घरी जाण्याची तिची वेळ काही ठरलेली नसे; ऑफिस जसं सुटेल तसं. परंतु गंमत अशी होई की तिने मामाच्या दारात पाऊल ठेवावं आणि मी केलेल्या फोनची रिंग वाजावी; असं नेहमी घडे. तिची मामी बोलेदेखील, “त्यांना कसं कळतं की तू पोहचलीस म्हणून, बरोबर तू पाऊल ठेवताच फोन कसा येतो?”
ह्याला म्हणतात मनं जुळणं.
हे साधलं की परमार्थ साधला; अट एकच, प्रेमपात्र बदलून तिथे श्रींना ठेवायचं; अर्थात मनाने.

थोडक्यात, आपल्यालाही त्या लग्नोत्सूक प्रेमपात्राप्रमाणे “भेटीची आवडी उताविळ मन। लागलेंसें ध्यान जीवीं जीवा॥” अशी श्रींच्या भेटीची तळमळ लागावी. आपलाही जीव त्यांच्या अमृतदृष्टीसाठी कासावीस व्हावा. आपल्याही जीवाला त्यांच्या वात्सल्याने ओतप्रत शब्दांविना चैन पडू नये. आपलंही मन त्यांच्या प्रेममय भेटीसाठी आतुर व्हावं. आपणही त्यांच्या वियोगाने, त्यांच्या विरहाने झूरावं; खाण्यापिण्यात लक्ष लागू नये, काही करावसं वाटू नये. आपणही आपल्या मनीचे गुज, सुखदुःख, त्यांच्यापुढे प्रकट करावे. आपणही कधी ते साकारात दर्शन देत नाहीत म्हणून त्यांच्याशी अबोला धरावा, त्यांच्यावर रुसावं; अगदी कट्टी घ्यावी. अबोला असा धरावा की पुन्हा पुन्हा त्यांना सांगावं, “मी तुमच्याशी बोलत नाही जा! कट्टी!, कट्टी!, कट्टी!” आणि न रहावून पुन्हा बोलायला जावं. आपला खोटा रुसवा बघून त्यांनी आपली मस्करी करावी म्हणून म्हणावं, “कट्टी तर कट्टी, बालं बट्टी, लिंबाचं पान तोडू नको, बारा वर्ष बोलू नको!” श्रींची ही वाक्य ऐकून त्यांच्या विरहाच्या कल्पनेने नयनात अश्रूंचा पूर यावा आणि आपण कळवळून त्यांना हाक मारावी, “माउली!”
थोडक्यात त्यांच्यावर जीव ओवाळून टाकावा; एवढं प्रेम करावं की त्यांना आपल्याशिवाय चैन पडणार नाही व माझ्या लेकराच्या, माझ्या बाळाच्या नेत्रात प्रेमाश्रू आले आहेत हे बघून त्यांना आपल्याबद्दल अधिकच माया निर्माण व्हावी, वात्सल्याचा उमाळा यावा, प्रेमपान्हा फुटावा, त्यांनी आपल्याला जवळ घेऊन आपल्या मस्तकाचं अवघ्राण करावं आणि गोपींप्रमाणे प्रेम करणाऱ्या भाऊसाहेबांविषयी ते जसं अत्यंत प्रेमाने बोलले “भाऊसाहेबांनी मला ऋणी केले आहे!”, तसं, अगदी तसंच, श्रींनी आपल्याविषयी बोलावं, “माझ्या लेकराने मला ऋणी केलं आहे!” आणि ते ऋण फेडण्यासाठी आपल्याला ‘चिरंतन समाधानाचा’ ठेवा द्यावा.

सारांश असा की अहेतुक प्रेमातून उत्पन्न झालेल्या त्यांच्या प्राप्तीच्या तळमळीने, जगाच्या उत्पत्ति-स्थिती-लयाला कारण असलेले सर्वांचे मुळ (श्री) हाती लागल्यामुळे आपल्याला जीवनाचे उच्चतम फळ (शाश्वत समाधान) हस्तगत होईल.
“उत्पत्तीपाळण संहाराचें निज। जेणें नेलें बीज त्याचे हातीं॥
तुका म्हणे आम्हां सापडलें मूळ। आपणचि फळ आलें हातां॥” १५४९

॥श्रीसद्गुरुचरणार्पणमस्तू॥

  • हृदय आठवणी १९५, १५२
    ** अमृतवाणी; रामकृष्ण-उपदेश-संग्रह पान १२