prarabdh shuddhi

Advertisements

||श्री||

|| प्रारब्धशुद्धी ||

आध्यात्मात प्रगती करायची असेल, तर प्रथम प्रारब्धशुद्धी करावी लागते. प्रारब्ध शुद्ध केल्याशिवाय आध्यात्मात कधीही प्रगती होत नाही. प्रारब्धाचे मुख्य तीन मुख्य भेद आहेत.

||संचित||

मानवाच्या चित्तामध्ये पूर्वीच्या हजारो जन्मांचे संस्कार साठलेले असतात. त्याचप्रमाणे पूर्वीच्या हजारो जन्मांतील कर्माचे व वासनांचे गाठोडे या चित्तामध्ये साठलेले असते. या गाठोडयाला ‘संचित’ असे म्हणतात.

||प्रारब्ध||

संचितामधून या जन्मी जे काही मानवाने भोगायचे आहे त्याला ‘प्रारब्ध’ असे म्हणतात. या प्रारब्धानुसारच माणसाला बुद्धी होत असते. म्हणून बुद्धिकर्मानुसारिणी म्हंटले जाते.

||क्रियामाण||

या जन्मी मनुष्य जे काही कर्म करतो त्या कर्मास ‘क्रियामाण’ कर्म म्हणतात. अर्थात, हे क्रियामाण कर्म पुन्हा संचितात जमा होत असते. व संचिताचे गाठोडे वाढतच असते. म्हणून प्रत्येक कर्म करतांना नीट विचार करून कर्म करावे व आपल्याला पाप लागणार नाही याची दक्षता घ्यावी.

संचित, प्रारब्ध, आणि क्रियामाण यांचे कार्य कसे चालते ते पुढील उदाहरणावरुन लक्षात येईल.
समजा, एखाद्या मनुष्याने त्याला आपण डॉक्टर व्हावे असे वाटू लागते. याला म्हणतात प्रारब्ध. हे प्रारब्धच त्याला डॉक्टर होण्याची प्रेरणा देत राहते व मला डॉक्टर व्हायचे आहे अशी तीव्र इच्छा त्याच्या मनात निर्माण करते. डॉक्टर होण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरु होतात. तो खुप मन लावून अभ्यास करु लागतो व एक दिवस डॉक्टर बनतो. याला म्हणतात ‘क्रियामाण’.
आजही भारतात असे ज्योतिषी आहेत की, जे कुंडली पाहताच डॉक्टर होणार की, वकील होणार, इंजिनिअर होणार की, आचारी होणार, हे अचूक सांगतात. मानवी जीवनातील सर्व गोष्टी या प्रारब्धाधीन आहेत व आध्यात्मात प्रगती जर हवी असेल, तर मुळावर घाव घालणे अतिशय आवश्यक असते. ही प्रारब्धशुद्धी कशी करायची हे आता पाहूयात.

दररोज किमान दोन तास जप किंवा एखाद्या स्तोत्राचे पाठ करायला हवेत. (एक तास सकाळी व एक तास संध्याकाळी.) या साधनेने हळूहळू प्रारब्धशुद्धी व्हायला सुरवात होते.

||दान||

आपल्या उत्पन्नातील किमान २० टक्के रक्कम दानधर्मात खर्च करायला हवी. याने प्रारब्धाची शुद्धी होते व लक्ष्मी स्थिर होते. दानाने धनाची वृद्धी होते व केलेल्या कार्यात यश प्राप्त होते. वेद शास्त्रे व अठरा पुराणे या सर्वांमध्ये दानाचा महिमा वर्णन केलेला आहे. सर्वसाधारण ईश्वरी महिमा असा आहे की, एखाद्या घराण्यामध्ये लक्ष्मी जास्तीत जास्त ६० वर्षे राहते. घराण्यातील पूर्वज जर जास्तच पुण्यवान असतील, तर लक्ष्मी ७५ वर्षांपर्यंतसुद्धा राहते. या कालावधीत पुण्याईचा क्षय होत असतो. घराण्यामध्ये कोर्ट-कचेऱ्या, भांडणे, कलह, पिशाच्च शक्तींचा उपद्रव, अशा प्रकारचे त्रास सुरु होतात. शेवटच्या १०-२० वर्षात सर्व संपूण जाते. दारिद्र्य, अहंकार, अज्ञान व मूढता यांच्या खाईत ते घराणे लोटले जाते. लक्ष्मी निघून जाते व अहंकार, दारिद्र्य व दुर्गुण घराण्यात शिल्लक राहतात. धन, यश, किर्ती, ऐश्वर्य, विद्या, सत्ता, सौंदर्य, सामर्थ्य या सर्व गोष्टी पूर्वपुण्याइने प्राप्त होत असतात व पूर्वपुण्याई ही दैनंदिन मानवी जीवणामध्ये रोजच खर्च होत असते. याकरिता पुण्याई सतत वाढवीत राहणे आवश्यक असते. ईश्वरचिंतन व दान याने पुण्याई वाढत राहते. म्हणून सतत ईश्वरचिंतन व दान करत राहायला हवे.
धनवानांनो ! या चंचल लक्ष्मीवर कधीही विश्वास ठेवू नका. अहंकार, घमेंड, स्वार्थ व लोभ अशा अनेक दुर्गुणांना बरोबर घेऊन ही लक्ष्मी आपल्या घरी येते. व ती जेव्हा जाते तेव्हा अनेक दुर्गुणांना आपल्या घराण्यात सोडून जाते, असे विद्वान लोकांचे म्हणणे आहे; परंतु खरी गोष्ट अशी आहे की, अपुऱ्या पुण्याईमुळे धन आल्यानंतर माणसाला अहंकार होतो व अहंकार सर्व दुर्गुणांना जन्म देतो. भरपूर पुण्याई असेल, तर खऱ्या अर्थाने लक्ष्मी प्रसन्न होते व लक्ष्मी प्रसन्न झाली असता ऐहिक, पारमार्थिक उन्नती होते.

||निरपेक्षता||

अपेक्षा हे सर्व दुःखांचे मूळ आहे. कोणाकडून कसलीही अपेक्षा करु नये. अगदी परमेश्वराकडून कसलीही अपेक्षा करु नये. आध्यात्मात प्रगती होण्यासाठी निरपेक्षता या गुणाची जोपासना करणे अत्यंत आवश्यक असते. निःस्वार्थ बुद्धी जेव्हा परिपक्व होते. तेव्हा तिला निरपेक्षता म्हणतात. निरपेक्षतेने अखंड समाधान प्राप्त होते. अन्तःकरण इतके विशाल होते की, प्रत्यक्ष परमेश्वर ह्रदयात येऊन राहतो. अशा विशाल हृदयाच्या भक्तांविषयी श्री ज्ञाणेश्वर माऊली म्हणतात…..

ययापरी पार्था | माझिया भजनी आस्था || तरी तया ते मी माथा | मुकुट करी ||

अथवा

देखे साधक निघोनी जावे | मागा पाउलांची ओळ राहे || तेथे ठायी ठायी होये | आणिमादिक |

नारायण हरी